रामदेव बाबांच्या पतंजलीने "कोरोनिल"च्या विक्रीतून केली बक्कळ कमाई; फक्त 4 महिन्यांत तब्बल 241 कोटी

By सायली शिर्के | Published: November 2, 2020 12:20 PM2020-11-02T12:20:01+5:302020-11-02T12:28:35+5:30

Baba Ramdev Patanjali Coronil Kit : रामदेव बाबा यांच्या पतंजलीने फक्त चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत.

कोरोना व्हायरसशी लढणारं औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' समूहाने कोविड-19 आजारावर 'कोरोनिल' या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती.

अश्वगंधा, गुळवेल, श्वासारी, तुळशी अशा वनौषधींपासून तयार करण्यात आलेलं औषध कोरोनारुग्णांना ठणठणीत बरं करू शकतं, त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतलीय, असा बाबा रामदेव यांचा दावा होता.

लाँचिंगपासूनच 'कोरोनिल' वादाच्या भोवऱ्यात सापडलं. यानंतर आता कोरोनिलच्या विक्रीतून पतंजलीने बक्कळ कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

रामदेव बाबा यांच्या पतंजलीने फक्त चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत.

कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून तब्बल 241 कोटी कमावले आहेत.

23 जून ते 18 ऑक्टोबरदरम्यान एकूण 23 लाख 54 हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याची माहिती कंपनीच्या अधिकृत आकडेवारीत देण्यात आली आहे.

ऑनलाईन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल असा दावा कंपनीने केला होता.

कोरोनिल औषधाची किंमत 545 रुपये ठेवण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 23 जूनला रामदेव बाबांनी आचार्य बाळकृष्ण यांच्यासह पत्रकार परिषद घेत कोरोनिल औषध लॉन्च केलं.

कोरोनिल औषधामुळे कोरोना आठवड्याभरात बरा होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

औषधाच्या चाचण्या, ते तयार करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने यावरून रामदेव बाबा आणि पतंजली वादात सापडले.

केंद्र सरकारसोबतच अनेक राज्यांनीदेखील कोरोनिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर पतंजलीनं यू-टर्न घेतला.

कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा कधीही केला नव्हता, असं म्हणत कोलांटीउडी मारली. मात्र आता कोरोनाने चार महिन्यात तब्बल 241 कोटींची कमाई केल्याची माहिती मिळत आहे.